Saturday, 9 August 2014

बाहेरच्या उमेदवारावरून काँग्रेसमध्ये राजकारण

अहमदनगर : नगर शहर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा असून काँग्रेसच्या ताब्यात राहणार असल्याचे सांगत शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी पुन्हा स्थानिक उमेदवार द्या, अशी मागणी केली. तसेच निवडणुकीसाठी दाखल इच्छुकांच्या यादीत सत्यजित तांबे यांचा अर्ज दाखल नसल्याचे माध्यमांना ठळकपणे कळविले. यावरून शहर मतदारसंघातून उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये राजकारण सुरू असल्याचे चित्र समोर आहे.

                    विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. हे अर्ज दाखल करण्यास शनिवारी अखेरची मुदत होती. त्यानुसार नगर शहर ब्लॉक कमिटीकडे सहा अर्ज दाखल झाले आहेत. यात स्वत: सारडा, महिला शहर जिल्हाध्यक्षा सविता मोरे, माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण, विनायक देशमुख, सुभाष गुंदेचा आणि उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा समावेश आहे. हे अर्ज ठरावासह आता प्रदेश समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. इच्छुकांच्या दाखल अर्जाची सोमवारी मुंबईत छाननी होऊन केंद्रीय निवड समितीकडे अंतिम निर्णयासाठी सोपविण्यात येणार आहे.

                          दरम्यान, शहर मतदारसंघातून उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षातून नवीन राजकारण सुरू झाले आहे. या ठिकाणी सत्यजित तांबे हे बाहेरचा उमेदवार आहे, असा प्रचार खुद्द शहराध्यक्ष सारडा यांच्याकडून सातत्याने सुरू आहे. एवढेच नाही तर माध्यमांना पाठविलेल्या इच्छुकांच्या अर्जाच्या वृत्तात ठळकपणे तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे नमूद केले आहे. यामुळे केंद्रीय निवड समितीने दाखल सहा इच्छुकांतून एकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. ही मागणी करत असताना सारडा यांनी देखील उमेदवारीसाठी इच्छुकांतून अर्ज दाखल केलेला आहे. सारडा वगळता तांबे हे बाहेरचे उमेदवार आहेत, असा आक्षेप कोणी घेतलेला नाही. (लोकमत प्रतिनिधी)

Monday, 28 July 2014

सभापतींच्या सोडतीत खुल्या गटाला लॉटरी

अहमदनगर: जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदासाठी सोमवारी काढलेल्या सोडतीत सहा पंचायत समित्यांचे सभापती पद सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे़ आगामी सभापतीपदाचे आरक्षण जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले असून, प्रशासनाने निश्चित केलेल्या आरक्षणानुसार सभापती निवडले जाणार आहेत.

                                                 जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली़ उपजिल्हाधिकारी डी. एम. बोरुडे, तहसीलदार राजेंद्र थोटे यावेळी उपस्थित होते़ सध्याचे सभापती पद व लोकसंखेच्या उतरत्या क्रमानुसार ही सोडत काढण्यात आली. मागीलवर्षी ज्या पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे, त्या पंचायत समित्या वगळून इतरांसाठी सोडत काढण्यात आली. या प्रवर्गासाठी टाकण्यात आलेली चिठ्ठी वरद राजेंद्र साळवे या विद्यार्थ्यांने काढली. त्यामध्ये नेवासा पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव झाले. तर कर्जत पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गाच्या व्यक्तीसाठी राखीव करण्यात आले. याच पध्दतीने अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठीची चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये पाथर्डी पंचायत समितीचे सभापतीपद या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या़ त्यामध्ये राहाता, नगर, श्रीरामपूर आणि जामखेडच्या चिठ्ठ्या निघाल्या़ या चार पंचायत समित्यांचे सभापतीपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाले़ उर्वरित सात पंचायत समित्यांचे सभापती पद सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे़ त्यातून पुन्हा चार महिलांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या़ त्यानुसार चार पंचायत समित्यांचे सभापतीपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे़ आगामी पंचायत समिती सभापतीपद वरील आरक्षणानुसार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (लोकमत प्रतिनिधी)

असे आहे सभापतींचे आरक्षण...
नेवासा- अनुसूचित जाती- महिला,
कर्जत- अनुसूचित जाती- व्यक्ती,
पाथर्डी- अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी,
राहाता- नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला,
नगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग,
श्रीरामपूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला,
जामखेड- नागरिकांचा मागास प्रवर्ग,
अकोले- सर्वसाधारण- महिला,
कोपरगाव- सर्वसाधारण,
शेवगाव- सर्वसाधारण- महिला,
श्रीगोंदा- सर्वसाधारण- महिला,
संगमनेर- सर्वसाधारण,
राहुरी- सर्वसाधारण- महिला,
पारनेर- सर्वसाधारण
सभापतीपदासाठी चक्रानुसार आरक्षण करण्यात येते़ मागील आरक्षण आणि लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली असून, आगामी सभापती पदाच्या निवडी सदर आरक्षणानुसार करण्यात येतील.

- डी़ एम़ बोरुडे, उपजिल्हाधिकारी.

Friday, 18 July 2014

सात नगरपालिकात महिला राज

अहमदनगर : शुक्रवारी झालेल्या शिर्डी, संगमनेर, कोपरगाव, देवळाली प्रवरा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता या सात नगरपालिकांच्या अध्यक्षपदी महिला विराजमान झाल्या़ पाथर्डीच्या नगराध्यक्षपदी राजेंद्र उदमले यांची निवड करण्यात आली़

महायुतीची मिरवणूक
शिर्डीच्या चौथ्या महिला नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अनिता विजय जगताप तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे निलेश मुकूंदराव कोते यांची बिनविरोध निवड झाली़ विशेष म्हणजे हे दोघेही सेना-भाजपा-राष्ट्रवादीच्या पाठबळावर निवडून आले आहेत़ गुरुवारी (दि़१७) काँग्रेसनेही आपले उमेदवार मागे घेत अनिता जगताप यांना पाठिंबा दिला़ नगरपंचायतमध्ये काँग्रेसचे नऊ तर सेना-भाजप-राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक होते़ शुक्रवारी (दि़१८) दुपारी दोनच्या सुमारास सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या अनिता जगताप व राष्ट्रवादीचे निलेश कोते मिरवणुकीने नगरपंचायत कार्यालयासमोर आले़ यावेळी गटनेते राजेंद्र गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, सुरेश आरणे, किरण बर्डे, आशा कोते, साधना लुटे, मंदाताई गुंजाळ, स्विकृत नगरसेवक शिवाजी गोंदकर उपस्थित होते़

काळे-कोल्हे एकत्र
मोठ्या राजकीय घडामोडीनंतर काळे आणि कोल्हे गट एकत्र आले़ तरीही खांबेकरांनी निवडणुकीला सामोरे जाण्याचा अट्टहास सोडला नाही़ मिनल खांबेकर यांना केवळ स्वत:च्या मतावर समाधान मानावे लागले़ भाजपा सदस्या भारती वायखिंडे तटस्थ राहिल्या़ त्यामुळे २६ पैकी २४ अशा बहुमताने कोपरगावच्या नगराध्यक्षपदी ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई निवडून आल्या़ नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते़ कोल्हे गटातर्फे अधिकृत उमेदवारी संगिता संजय रूईकर यांना तर काळे गटाकडून ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांना उमेदवारी देण्यात आली़ विद्यमान उपनगराध्यक्षा मिनल खांबेकर यांनी कोल्हेंचे म्हणणे झुगारून उमेदवारी कायम ठेवली होती़ मतदान प्रक्रियेपर्यंत काळे आणि कोल्हे यांच्यात एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती़ सभागृहात सभेचे कामकाज सुरू झाले तरीही कोणताच निर्णय होत नव्हता़ अखेर संजीवनी कारखान्याच्या व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये बसलेल्या माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आ़ अशोक काळे, बिपीन कोल्हे यांच्याकडून पालिकेत निरोप आला़ आणि अचानक कोल्हे गटाच्या अधिकृत उमेदवार संगिता रूईकर यांच्यासह २३ नगरसेवकांनी सातभार्इंच्या बाजूने हात उंचावून मतदान केले़ खांबेकर सभागृहात एकाकी पडल्या़ त्यांना स्वत:च्याच मतावर समाधान मानावे लागले़ भाजपाच्या एकमेव सदस्या भारती वायखिंडे तटस्थ राहिल्या़ सातभाई या कोपरगाव पालिकेच्या इतिहासातील ३५ व्या नगराध्यक्षा आहेत़ त्यांचे सासरे स्व़ वसंतरराव सातभाई हे १९७४ ते ७६ आणि १९८६-८७ या काळात नगराध्यक्ष होते़ त्यानंतर पती संजय सातभाई हे १९९३ ते ९६ या काळात नगराध्यक्ष होते़

उषा तनपुरे तिसऱ्यांदा विराजमान
राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाच्या डॉ़ उषाताई तनपुरे तर उपनगराध्यक्षपदी इस्माईल सय्यद यांची बिनविरोध निवड झाली़ निवडणूक निर्णय अधिकारी भागवत डोईफोडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत राहुरी नगरपरिषदेच्या सभागृहात नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली़ नगराध्यक्षपदासाठी तनपुरे यांच्या अर्जावर सुचक म्हणून दिनकर पवार तर अनुमोदक म्हणून अनिता पोपळघट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ उपनगराध्यक्षपदासाठी इस्माईल सय्यद यांच्या अर्जावर सुचक म्हणून सोमनाथ तनपुरे तर अनुमोदक म्हणून सदाशिव सरोदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ उपनगराध्यक्षपदासाठी अर्चना तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्यानंतर उपनगराध्यक्षपदी सय्यद यांच्या नावाची घोषणा झाली़ यावेळी नगरसेविका गयाबाई ठोकळे, दिनकर पवार, सपना भुजाडी, सुनिल पवार, ज्योती पोपळघट, ताराबाई भुजाडी, अनिता पोपळघट, अनिल कासार, रावसाहेब तनपुरे, अरूण ठोकळे आदी उपस्थित होते़

श्रीरापुरात ससाणे
श्रीरामपूर नगराध्यक्षपदी राजश्री जयंत ससाणे व उपनगराध्यक्षपदी कांचन दत्तात्रय सानप यांची निवड झाली़ प्रांताधिकारी प्रकाश थविल हे पिठासन अधिकारी होते. त्यांना मावळते प्रशासक तथा तहसीलदार किशोर कदम, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी निवडणूक प्रक्रियेत सहाय्य केले. ससाणे, सानप यांच्यासह पक्षप्रतोद संजय फंड, संजय छल्लारे, दिलीप नागरे, अप्पा गांगड, श्रीनिवास बिहाणी, दत्तात्रय साबळे, अण्णासाहेब लबडे, राजेंद्र महांकाळे, आशीष धनवटे, राजन चुग, शामलिंग शिंदे, शाम अडांगळे, मुजफ्फर शेख, कैलास दुबय्या, अंजूम शेख, राजश्री सोनवणे, मंगल तोरणे, सुमैय्या पठाण, संगीता मंडलिक, जायदाबी कुरेशी, सुधा कांबळे हे सत्ताधारी व रजियाबी जहागीरदार या एकमेव विरोधी सदस्य असे एकूण २४ नगरसेवक विशेष सभेला उपस्थित होते़ नगराध्यक्षपद मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने ससाणे यांचा एकमेव अर्ज होता. उपनगराध्यक्षपदासाठीही सानप यांचा एकमेव अर्ज होता़ पिठासन अधिकारी थविल यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

उदमले बिनविरोध
पाथर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजेंद्र उदमले यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी दुपारी पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती कावरे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली़ रामगिरबाबा आघाडीच्या माजी नगराध्यक्षा जनाबाई घोडके, बजरंग घोडके व राष्ट्रवादीच्या ज्योती बोरूडे हे गैरहजर राहिले. नगराध्यक्षपद हे अनुसूचीत जातीसाठी राखीव होते. उदमले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळते नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष दिपाली बंग यांच्यासह राष्ट्रवादीचे १३ नगरसेवक व रामगिरबाबा आघाडीच्या वंदना टेके उपस्थित होते. राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक असून राजीव राजळे यांना मानणारे दहा, आ. चंद्रशेखर घुले यांना मानणारे दोन तर प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांना मानणारे दोन नगरसेवक आहेत. उदमले हे राजळे गटाचे आहेत़

त्रिभुवन बारा मतांनी विजयी
देवळाली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती त्रिभुवन १२ मतांनी विजयी झाल्या़ उपनगराध्यक्षपदी काँगे्रसचे अनंत कदम यांची बिनविरोध निवड झाली़ निवडणूक निर्णय अधिकारी दानेश व सहाय्यक निवडणूक अधिकारी विनोद जळक यांनी त्रिभुवन व कदम यांची निवड जाहीर केली़ नूतन नगराध्यक्षा ज्योती त्रिभुवन यांचा माजी नगराध्यक्षा मंदाकिनी कदम यांनी सत्कार केला़ उपनगराध्यक्ष अनंत कदम यांचा माजी उपनगराध्यक्षा शुभांगीताई पठारे यांनी सत्कार केला़ नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे सुरेंद्र थोरात यांनी अर्ज दाखल केला होता़ थोरात यांना ६ मतावर समाधान मानावे लागले़

विखे गटाचेच वर्चस्व
राहाता नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी लताबाई चंद्रभान मेहत्रे व उपनगराध्यक्षपदी संजय रामचंद्र सदाफळ यांची निवड करण्यात आली़ निवडणूक निर्णय अधिकारी डी़ एऩ कर्डक व मुख्याधिकारी जयदीप पवार यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवड घोषित केली़ निवडणुकीनंतर कृषि व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते मेहत्रे व सदाफळ यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब डांगे, रघुनाथ बोठे, रामातात्या गाडे, सुभाष गाडेकर आदी उपस्थित होते़

थोरात गटाची बाजी
संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत दुर्गाताई तांबे व उपनगराध्यक्षपदी जावेद जहागीरदार यांनी विजय मिळविला़ त्यांनी अनुक्रमे अल्पना तांबे व अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांचा पराभव केला.शुक्रवारी रामकृष्ण सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संदीप निचित यांच्या अधिपत्याखाली निवडणूक प्रक्रिया झाली. नगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी गटातर्फे दुर्गाताई तांबे व विरोधी गटातर्फे अल्पना तांबे यांच्यात लढत झाली. हात वर करून उमेदवारास पसंती दर्शविण्यात आली. दुर्गाताई तांबे यांना २० मते पडली. तर अल्पना तांबे यांना ६ मते पडली. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका अनिता बर्गे या उशिरा आल्याने त्यांना मतदानात सहभाग घेता आला नाही. उपनगराध्यक्ष पदासाठी सत्ताधाऱ्यातर्फे जहागीरदार तर विरोधकांतर्फे अ‍ॅड. श्रीराम गणपुले रिंगणात होते. जहागीरदार यांना २१ व गणपुले यांना ६ मते पडली. मावळते नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी नगरसेवक किशोर पवार, नितीन अभंग, गोरख कुटे, गजेंद्र अभंग, पूनम मुंदडा, शोभा पवार, जुलेखा शेख, नजमा मणियार, सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, अजय फटांगरे, मिलींद कानवडे, निखील पापडेजा आदी उपस्थित होते.

Sunday, 13 July 2014

नगराध्यक्ष निवडीचे राजकारण तापले

अहमदनगर: जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या अध्यक्षांनी निवड शुक्रवारी होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अंतर्गत गटबाजीने पक्षाचे प्रमुखही पेचात सापडले आहे. नगराध्यक्ष कोण होणार? याची उत्सुकता नागरिकांना लागली असून नाव अंतिम करताना पक्ष प्रमुखांचीही कसरत सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा राजकीय आढावा...

    राहुरीत उषाताई तनपुरे निश्चित, देवळालीत उत्सुकता
                                    राहुरी व देवळाली नगरपरिषद नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षदी कुणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे़ १८ जुलै रोजी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. राहुरी नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिलेसाठी, तर देवळाली प्रवरा मागासवर्गीयासाठी राखीव आहे़ राहुरी नगरपरिषदेत जनसेवा मंडळाचे १६, नागरी विकास मंडळाचे ३ व अपक्ष १ असे बलाबाल आहे़ नगराध्यक्षपदासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. उषाताई तनपुरे यांचे नाव निश्चित आहे़ त्यामुळे अन्य कुणीही नगराध्यक्षपदासाठी दावा केलेला नाही़ उपनगराध्यक्ष पदासाठी कुणाचेही नाव अद्याप निश्चित झालेले नाही़ इच्छुकांमध्ये राजेंद्र उंडे, भारी सरोदे, सोनाली उदावंत, अर्चना तनपुरे यांची नावे चर्चेत आहेत़ विरोधकांचे संख्याबळ कमी असल्याने नगराध्यक्षपदी सत्ताधारी जनसेवा मंडळाच्या उमेदवाराची बिनविरोध वर्णी लागण्याची शक्यता आहे़ देवळाली नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे ५, राष्ट्रवादी पुरस्कृत २, काँग्रेसचे ५, तर भाजपचे ६ नगरसेवक आहेत़ काँगे्रस व राष्ट्रवादी सत्तेत आहे़ नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती त्रिभुवन यांचे नाव चर्चेत आहे़ शिवाय भाजपतर्फे सुरेंद्र थोरात इच्छूक आहेत. उपनगराध्यक्षपदासाठी अनंत कदम व ज्योती गिरमे यांची नावे पुढे येऊ शकतात. राहुरी नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून गयाबाई ठोकळे, तर उपनगराध्यक्ष म्हणून दिनकर पवार यांनी काम पाहिले आहे. देवळाली नगर परिषदेत मंदाकिनी कदम नगराध्यक्ष, तर उपनगराध्यक्ष म्हणून शुभांगी पठारे कार्यरत होते.

    कोपरगावचे नगराध्यक्षपद नशिबावर
                                         कोपरगाव नगराध्यक्षपदाची निवड जवळ येऊन ठेपली तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे़ समान संख्याबळाच्या खेळामुळे पुन्हा चिठ्ठी टाकून नगराध्यक्ष निवडला जातो, की काळे-कोल्हे गटात फोडाफोडीचे राजकारण होते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़ कोपरगाव नगरपालिकेत कोल्हे गटाचे ११, काँग्रेस व भाजपा प्रत्येकी एक असे मिळून सत्ताधारी पक्षाचे तेरा, तर आ़ काळे यांच्या जनविकास आघाडीचे तेरा असे समसमान संख्याबळ आहे़ अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या़ त्यावेळी कोल्हे गटाचे नशीब बलवत्तर होते़ दोन्ही पदे त्यांना मिळाली. येत्या आठ दिवसांत पुन्हा नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे़ खुल्या संवर्गातील महिलेसाठी नगराध्यक्षपद आरक्षित आहे़ नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्या पत्नीस मिळावे, यासाठी नवरोबांच्या खेट्या काळे-कोल्हेंच्या दरबारी सुरू आहेत. सत्ताधारी गटाकडून विजया देवकर, सिंधूताई कडू, संगीता रूईकर, शोभा पवार, अलका लकारे, सुनीता जगदाळे या प्रयत्नशील असून उपनगराध्यक्षा मिनल खांबेकर (काँग्रेस) व भारती वायखिंडे (भाजप) यांनी अडीच वर्षांपासून कोल्हे गटाला पाठिंबा दिलेला असल्याने त्याही या पदावर आपला दावा सांगत आहेतक़ाळे गटाकडून ऐश्वर्या सातभाई, वैशाली आढाव, सपना मोरे, पद्मावती बागूल व सिंधूताई शिंगाडे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत़ आमचे नगरसेवक एकसंघ आहेत, असे काळे आणि कोल्हे गटाकडून सांगण्यात येत असले तरीही एकमेकांचे नगरसेवक फोडण्याच्या हालचाली पडद्याआड सुरू आहेत़ तसे झाले तर सत्ता कुणाच्या तरी एकाच्या ताब्यात येईल, अन्यथा पुन्हा चिठ्ठ्यांच्या खेळात कोण लकी लेडीसिद्ध होते, याकडे शहरवासियांचे लक्ष असेल.

    नगराध्यक्ष निवडीला अंतर्गत गटबाजीचे ग्रहण

                                            पाथर्डी नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या पदावर प्रियंका काळोखे की राजेंद्र उदमले विराजमान होणार हे राजीव राजळे यांच्यावर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. काळोखे किंवा उदमले यापैकी कोणीही नगराध्यक्ष झाले तरी विद्यमान नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्याच हातात पालिकेच्या चाव्या रहातील असे बोलले जात आहे.पालिकेत राष्ट्रवादीचीच सत्ता असून अंतर्गत गटबाजीमुळे पालिके चे वातावरण नेहमीच तापलेले असायचे. पालिकेत एकूण सतरा नगरसेवक असून पालिका निवडणुकीत राजीव राजळे व आमदार चंद्रशेखर घुले यांनी एकत्रित प्रचार करून बारा नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आणले. उर्वरित पाच पैकी माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके यांच्या रामगीरबाबा आघाडीचे तीन तर प्रताप ढाकणे यांना मानणारे दोन नगरसेवक आहेत.अलीकडील काळात प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांना मानणारे डॉ.दीपक देशमुख व डॉ.शारदा गर्जे या सुध्दा राष्ट्रवादीत आल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ १४ झाले आहे.परंतु राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे नगराध्यक्ष नेमका कोणाच्या गटाचा होणार याविषयी चर्चा रंगू लागली आहे.आ. घुले व ढाकणे हे दोन्ही युवा नेते एकाबाजूला तर राजीव राजळे हे दुसऱ्या बाजूला अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे त्यामुळे नगराध्यक्ष कोणाच्या गटाच्या यालाही महत्व येणार आहे.सध्याच्या संख्याबळानुसार विचार करता राजळे हे सांगतील तोच नगराध्यक्ष होणार हे स्पष्ट असले तरी विद्यमान नगराध्यक्ष अभय आव्हाड हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून त्यांनी आ.पंकजा मुंडे यांची भेट घेतली असल्याचे समजते.चालू महिन्यात त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे बोलले जाते. पालिकेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काळोखे व उदमले हे याच प्रवर्गाचे आहेत. येत्या १८ तारखेला होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजीव राजळे हे कोणाच्या नावाला हिरवा कंदील देतात यावर निवड अवलंबून आहे.अडीच वर्षासाठी हे पद असल्याने सव्वा ,सव्वा वर्ष काळोखे व उदमले यांना संधी मिळू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे.काळोखे व उदमले हे दोघेही विद्यमान नगराध्यक्ष अभय आव्हाड यांचेच समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने पालिकेच्या चाव्या आव्हाड यांच्याच हातात रहाणार हे स्पष्ट असून त्यांचीच मोहोर पालिकेच्या राजकारणावर रहाणार हे निश्चित.